निष्कर्ष ...!!

निष्कर्ष ...!!

चुकलेल्या माणसाला
माफ का करावे ?
माणसातील माणुसपणाने …
आणि तेही मोठ्या मनाने …??

का काढू नयेत माणसाने
माणसांच्या वागण्याचे निष्कर्ष ??
कधीही …!!

माणसाला छळतात असे प्रश्न
कधी कधी … कधीही … 
केव्हाही … त्याच्याही नकळत …

पण नेमकं काय असतं
एका माणसाच्या वागण्याचे
दुसऱ्याने निष्कर्ष काढणं … 
आणि
एका माणसानं दुसऱ्याला 
माफ करणं …?

माणूस कधी बघतो का 
विचारून असा प्रश्न ...
आपणच आपल्याच मनाला …

दुसऱ्याच्या वागण्याचा निष्कर्ष काढणं,
आणि त्याला आपल्या तराजूत  तोलणं,
आहे का न्याय्य ..??

का लावायचा कस
सोन्याच्याच कसोटीवर
इतरही धातूंचा ...??

का माफ करण्यातही असतो स्वार्थ ...
माणसातलं माणूसपण दाखवण्याचा
आणि मोठ्ठया मनाचे प्रदर्शन करण्याचा …!!

काढावेत निष्कर्ष …
माणसानं माणसांच्या वागण्याचे ...
फक्त त्याला तोलताना
घ्यावा तराजू,
त्याच्याच अनुभवांचा …

करावं माफ इतरांना …
त्यात असलाच स्वार्थ,
तर तो केवळ आपल्या
मनाला त्रास न देण्याचा ...
मनःशांती ढळू ना देण्याचा …
आपल्या प्रसन्नतेला
परावलंबी न करण्याचा …

जळू देऊ नये आपले मन
त्वेषाने, द्वेषाने, संतापाने …
जाळावे आपल्या व्यथेला
न भडकता अगदी शांतपणे …

अगदी कापरा सारखे ...
सुगंधाचा दरवळ देत ...

जळून गेल्यावर राहू नये
व्यथेचा मागमूसही ..
चिमूटभर राखे इतका ....

(दत्तप्रसाद | 201016)
__________________________________
प्रसाद द. पोफळी, नागपूर | 9822569648

Comments